स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘थ्रेड्स ऑफ इंडिया’ संकल्पनेवर आधारित दृश्यरचना; १५ ऑगस्टला वाळूशिल्पाचे थेट सादरीकरण
नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताची विविधता, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि सर्जनशीलतेचा अनुभव देण्यासाठी वाशी येथील इनऑर्बिट मॉलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कला, सर्जनशीलता आणि संस्कृती यांचा अनोखा मिलाफ असलेल्या या उपक्रमांमधून भारताच्या विविध प्रांतांच्या परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा परिचय नागरिकांना करून दिला जाणार आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून ७ ते १४ ऑगस्टदरम्यान ‘थ्रेड्स ऑफ इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विशेष दृश्यरचना (व्हिज्युअल मर्चंडायझिंग) साकारण्यात आली आहे. मॉलच्या अॅट्रियममध्ये उभारण्यात आलेल्या या दृश्यरचनेत मॉलमधील पारंपरिक पोशाखांच्या ब्रँड्सच्या भारतीय संग्रहातील निवडक उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. देशातील विविध प्रांतांच्या संस्कृती आणि परंपरांपासून प्रेरणा घेतलेल्या या संग्रहातून भारतीय फॅशनमधील सर्जनशीलता, कारागिरी आणि प्रादेशिक सांस्कृतिक प्रभाव अधोरेखित होणार आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, १५ ऑगस्टला या उपक्रमांची सांगता विशेष थेट वाळूशिल्प सादरीकरणाने होणार आहे. प्रसिद्ध वाळूशिल्प कलाकार सर्वम पटेल हे मॉलमध्ये थेट वाळूशिल्प सादर करणार आहेत. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘हुनरबाज’, ‘झी सुपर टॅलेंट’ तसेच ‘टीईडीएक्स’ या व्यासपीठांवरील सहभागासाठी पटेल ओळखले जातात. वाळूच्या माध्यमातून प्रभावी कथा आणि प्रसंग साकारत ते भारताचा प्रवास, देशाची यशस्वी वाटचाल आणि देशाच्या चिरंतन जिद्दीचे भावस्पर्शी चित्रण करणार आहेत.
या उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा अनुभव अधिक अर्थपूर्ण करण्याचा इनऑर्बिट मॉलचा प्रयत्न आहे. भारताची सर्जनशीलता, कलागुण आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा उत्सव साजरा करताना नागरिकांना एकत्र आणणारे वातावरण निर्माण करण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे. खरेदी, कला आणि थेट मनोरंजन यांची सांगड घालत स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची वेगळी संधी या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे.
