अंधत्व नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी परानुभूती फाउंडेशन द्वारे नेत्र सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, वसई-विरार विभाग आणि पालघर जिल्ह्यात नेत्र आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.
मुंबई, अप्रैल 8: आजच्या या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसाचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात इतर आरोग्याच्या प्रश्नांसह डोळ्यांच्या आरोग्यकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, बऱ्याचदा ते होताना दिसत नाही. नेत्र आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वपूर्ण बाब असून, डोळ्यांच्या समस्यांमुळे अंधत्वाचा धोका वाढू शकतो. यावर उपाय म्हणून परानुभूती फाउंडेशन आणि आयडियल क्युअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा सीएसआर उपक्रम या दोहोंच्या संयुक्तविद्यमाने एक महत्वाकांक्षी व व्यापक असे नेत्र सेवा अभियान राबवले जात आहे.
या उपक्रमामधून गरीब, मागास व आदिवासी, दुर्गम भाग, गोरगरीब गरजू जनता यांसारख्या नागरिकांना डोळ्यांचे आजार यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशा आदिवासी पाड्यांमध्ये या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे परानुभूती फाउंडेशनने अशा भागांमध्ये आरोग्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे. या विचारातूनच आरोग्य सेवेचा ध्यास घेऊन परानुभूती फाउंडेशनने नेत्र सेवा अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून वंचित आणि गरजू नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळ्यांची तपासणी, औषधे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळेस होऊन त्याचे डोळे वाचवण्यास मदत होत आहे.
या अभियानात परानुभूती फाउंडेशनचे नेत्र सर्जन व संस्थापक संचालक - डॉ गणेश मुंजवाल, जनरल फिजिशियन व संस्थापक संचालक - डॉ. प्रविण तळेले, मुख्य समन्वयक - राहुल समिंद्रे, नेत्र तपासणी तज्ञ - शीला समिंद्रे, पल्लवी आग्रे, परानुभूती फाउंडेशनचे कार्यकारी संचालक - डॉ भूषण जाधव, परानुभूती फाउंडेशनचे प्रकल्प संचालक - मंगेश राय यांचाही समावेश आहे. त्याच प्रमाणे अनेक स्वयंसेवक जसे रागिनी यादव, चंदन कांबळे, पूजा सोनवणे, किरण मोहंती, कृणाली फडवळे, प्रार्थना पेंढारी, जे बी सिंग, डॉ. हरीश नागावकर, जयेश वीर यांनी मोलाचे योगदान दिले.
तसेच बर्फेश्वर तलाव गार्डन प्रमुख - शरद पाटील, ओंकार अंध अपंग संस्था प्रमुख - सुरेश पवार, रॉबिन हूड आर्मी प्रमुख - हिमांशू धांडे व इम्तियाज अली , जिल्हा परीषद शाळा वाघराळ पाडा शिक्षिका - कल्याणी मॅडम, फिनिक्स फार्म प्रमुख - मुरली नारायण आणि वाडा पोलीस स्टेशन उपनिरीक्षक - दत्तात्रय किंद्रे यांचा कडून विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे आनंद गदगी आणि अशीति जोईल या प्रकल्पासाठी मीडिया प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत.
या प्रकल्पाची नेमकी उद्दिष्टे काय?
परानुभूती फाउंडेशनच्या या उपक्रमांतर्गत १५ नेत्र शिबिरे तसेच अनेक मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यातील काही प्रमुख सेवा या पुढीलप्रमाणे आहेत:
1. मोफत चष्मे वाटप.
2. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे.
3. मोफत आयड्रोप्स आणि औषध वाटप करणे.
4. तज्ज्ञ नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टरांकडून उपचार देणे.
5. डोळ्यांच्या विविध आजारांबद्दल जागरूकता आणि समुपदेशन करणे.
6. शस्त्रक्रियेनंतरची घेतली जाणारी काळजी आणि उपचारांचा पाठपुरावा करणे, इत्यादी प्रमुख सेवा योजल्या आहेत.
शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी कशी आहे ते पाहू?
परानुभूती फाउंडेशनने मार्च व एप्रिल २०२५ मध्ये दर आठवड्याला ३ ते ४ नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन केले असून, ही शिबिरे प्रामुख्याने वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम, गरजू ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये घेतली जात आहेत. परानुभूती फाउंडेशनच्या या उपक्रमातून सुमारे २००० पेक्षा जास्त लाभार्थी नेत्र तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतील. यामध्ये किशोरवयीन मुले, तरुण, महिला आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मोतीबिंदूबाधित रुग्णांची निवड केली जात असून त्यांना समुपदेशनसुद्धा दिले जात आहे. याशिवाय परानुभूती फाउंडेशनने ज्या रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना उच्च केंद्रांमध्येसुद्धा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा उपक्रम नेत्र आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याबरोबरच अंधत्व टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वंचित आणि गरजू नागरिकांना दर्जेदार उपचार आणि नेत्र आरोग्य सेवा मिळावी, यासाठी परानुभूती फाउंडेशन आणि आयडियल क्युअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा हा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
अशा प्रकारच्या मोहिमा समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि भविष्यातही अशाच सेवा देण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या उपक्रमातून दृष्टीहीनतेचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यासाठी परानुभूती फाउंडेशन ला लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण आर्थिक योगदान करून तसेच स्वयंसेवक म्हणून संस्थेला मदत करू शकता.