जयपूर: इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) वीकेंड आणि अवॉर्ड्सचा रौप्यमहोत्सवी सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. भारतीय सिनेमाच्या जागतिक वारशाचा सन्मान करणारा हा ऐतिहासिक सोहळा ८ व ९ मार्च २०२५ रोजी राजस्थानची राजधानी आणि गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये संपन्न होणार आहे. या भव्य सोहळ्यात सिनेमा आणि संस्कृतीचा एक अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे.
बॉबी देओल यांनी IIFA च्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले, "IIFA हा केवळ पुरस्कार सोहळा नाही, तर तो भारतीय सिनेमाच्या जादूचा आणि जगभरातील चाहत्यांसोबत असलेल्या अनमोल नात्याचा उत्सव आहे. या मंचावर कलाकार म्हणून अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवल्यानंतर, आता IIFA च्या २५ वर्षांच्या प्रवासाचा साक्षीदार होण्याचा विशेष सन्मान मला मिळत आहे. जयपूरमध्ये हा सोहळा साजरा करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या चाहत्यांसोबत आणि इंडस्ट्रीतील मित्रांसोबत या सोहळ्याचा आनंद लुटण्यास मी उत्सुक आहे."
बॉबी देओल पुढे म्हणाले, "प्रत्येक वर्षी IIFA हा सिनेविश्वातील भावना, आठवणी आणि प्रेम एकत्र आणतो. माझ्यासाठी, IIFA हा केवळ कलाकार म्हणून नाही, तर एक परफॉर्मर म्हणूनही अविस्मरणीय प्रवास ठरला आहे. या मंचावर माझे अनेक सुंदर क्षण राहिले आहेत. २५ वर्षे हा प्रवास भारतीय सिनेमाच्या जागतिक ओळखीचा मोठा टप्पा आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. जयपूरमध्ये हा सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरणार आहे, जिथे आनंद, आठवणी आणि सिनेमा यांचा मिलाफ होणार आहे. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेल."
भारतीय सिनेमाच्या आणि जागतिक कला वारशाच्या या भव्य सोहळ्यासाठी जयपूर सज्ज होत आहे. ८ व ९ मार्च २०२५ हे दिवस आपल्या कॅलेंडरमध्ये नोंदवा आणि सिनेसृष्टीच्या या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार बना!